मुंबई पिढ्यांनपिढया तुझ्या ह्रदयात राहून ही कधी तुझ्यावर एक साधं वाक्य ही लिहीलं नाही याची खंत वाटते. पण असो आज तीच खंत मी या लेखातून भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. चर्चगेट पासून माहीम आणि फोर्ट पासून सायन पर्यंत असलेली मुंबई आता अवाढव्य झाली आहे. ( माझी मुंबई माझं गिरणगाव )
या महानगरी मुंबईत गिरणगाव आजही माहित असेल का आजच्या मुंबईत राहणाऱ्या लोकांना म्हणजे महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी अशी अनेक विभूषणे आज सगळ्यांना माहिती असतीलच. पण ही विभुषणे मुंबई ला प्राप्त करून देणाऱ्या गिरणगावाला आपण सोईस्कर रित्या विसरलो. आणि आज तेच गिरणगाव काळाच्या पडद्याआड चाललयं.गिरणगावाने स्वतः झिजून मुंबई ला चमकवले ते आज झिजूनझिजून स्वतःच नष्ट होण्याचा मार्गा वर आहे.
चाळीच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहिले आणि गिरण्यांच्या जागी मोठमोठाले माॅल,कॉर्पोरेट कार्यालय. चाळींचा रूपात वसलेल गिरणगाव काळाच्या प्रवाहात वाहुन चालायं त्या काळात असंख्य चाळीच्या रूपात सजलेली मुंबई खूप सुंदर दिसत असली तरी आज ती सुंदरता मुंबईत दिसत नाही. आज मुंबईत होणाऱ्या विकासाला गिरणगाव अडसर ठरत आहे. याचच ताज उदाहरण म्हणजे मेट्रो 3 मुळे बाधित होणाऱ्या गिरणगावतील जुन्या चाळी तेथील वर्षोनुवर्ष राहणारे रहिवासी.
आधी भोंगाच्या आवाजावर चालणारी मुंबई आता घडाळ्याच्या काट्या वर धावते. गिरणगाव जसं डाॅक्टर , इंजिनिअर तसं मिल कामगार हे ही एक बिरूदचं होतं. याच मिल कामगारांनी हे गिरणगाव वसवलं. नावारुपाला आणलं. पण 1982 सालच्या संपाने गिरणगाव हादरून गेलं.मिल कामगार देशोधडीला लागला आणि त्यानंतरच गिरणगावाला उतरती कळा लागली.
गिरणगावचं अस्तित्व हळूहळू नष्ट होत चालंय अस असल तरी आज ही साजर्या होणाऱ्या इथल्या उत्सवातुन गिरणगावा ची छोटीशी झलक आमच्या पिढीला दिसते इतकंच काय ते समाधान. चाळी तेथील माणसं त्याचे विविध स्वभाव एकमेकांचा सुख दुःखात धावून जाण्याचे संस्कार आणि किती भांडलो तरी मनात असलेला आपले पणा तोच आपलेपणा चाळीच्या जागी उभ्या राहिलेल्या बिल्डिंगस मध्ये आता दिसत ही नाही. गिरणगाव आज इतकं हरवलेल आहे की ते,कुठल्या पुस्तकात शोधलं तरी ही सापडत नाही.
ज्या मराठी माणसांनी हे गिरणगाव वसवलं त्यांचेच वारसदार आज मुंबईच्या सीमेपलीकडे राहायला गेले. गिरणगावात राहणारी लोकं गिरणगाव विसरून गेली. काळानुरुप मुंबईमध्ये झालेले बदल साऱ्यांनीच स्वीकारले. त्याच बदलांचा परिणाम आज गिरणगावाचं अस्तित्व मुंबईमध्ये फारस दिसत नाही. पण मला खात्री आहे.मुंबईच्या इतिहासामध्ये गिरणगावावर खुप काही लिहल जाईल आणि गिरणगावामुळेच आज मुंबई मुंबई आहे हे येणाऱ्या प्रत्येक पिढीला कळेल. ( माझी मुंबई माझं गिरणगाव )
जगभरात गाजतय तुझं मुंबई अस नाव….तुला नावारुपाला आणलं ज्यानेते अस्तित्व हरवत चाललेलं माझं गिरणगाव….
लेखन साभार – मनिष चांदले
( माझी मुंबई माझं गिरणगाव )