Saturday, September 21, 2024
Homeआपले दादरशिवाजी पार्क - क्रिकेट म्हणजे दादर आणि दादर म्हणजे क्रिकेट..!!

शिवाजी पार्क – क्रिकेट म्हणजे दादर आणि दादर म्हणजे क्रिकेट..!!

शिवाजी पार्क . “दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं, मुबईतल्या सगळ्या उपनगरांचं ते फादर असतं” बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेशी वाचलेली हि ओळ मनात कायम घर करून राहिली.. कारण दादर पण मनात घर करून राहिलय..!!

दादर म्हणजे साहेब, दादर म्हणजे सेना, दादर म्हणजे शिवाजी पार्क , दादर म्हणजे मराठी माणूस.. अशी बरीच समीकरणं आहेत, प्रत्येकाची आपापली आहेत.. तसं माझंही एक समीकरण आहे.. दादर म्हणजे क्रिकेट..!!

मुंबई ला क्रिकेट ची पंढरी म्हणतात.. अर्थात क्रिकेट ची पताका उंचावणारे कित्येक क्रिकेट चे वारकरी इथल्याच मातीतून आले.. पण मुंबई जर क्रिकेटची पंढरी असेल तर विठ्ठलाचं देऊळ मात्र दादर ला आहे.. आमच्या शिवाजी पार्कवर आहे. आमचा विठोबा, तुकाराम, ज्ञानेश्वर, चोखामेळा इथल्या खेळपट्यांवर खेळताना घडताना पाहिले आम्ही आणि आमच्या पिढ्यांनी, एक एक नावं लिहीत राहिलो तर जागा पुरणार नाही अशी एकशे एक मात्तबर, दादा क्रिकेट ची मंडळी ह्याच लाल मातीत घडली. वाडेकर, गावस्कर, मांजरेकर, तेंडुलकर ह्यांनी ह्याच लाल मातीचा तिळा लल्लाटी लावून, आपला तिरंगा विश्वविजयी केला.

शिवाजी पार्क   shivaji park

“दादर युनिउन स्पोर्टींग क्लब”

दादर च्या क्रिकेट इतिहासात डोकावलं तर बरीच नावं गर्वाने उंच माना घेऊन मिरवताना दिसतात, पण ह्या साऱ्या नावांमध्ये एक नाव अगदी शड्डू थोपटून उभं राहतं, ते नाव म्हणजे “दादर युनिउन स्पोर्टींग क्लब”. दादर युनियन म्हणजे शिस्त, दरारा आणि क्रिकेटच्या हिऱ्यांची खाण, सुनील गावस्करांसारखा कोहिनूर ह्याच खाणीतून आला आणि पुढे त्याने क्रिकेटचं विश्व दिपवून टाकलं. दादर युनियन मधून खेळलेले कित्येक खेळाडू पुढे मुंबई साठी रणजी आणि भारतासाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. युनियन ला खेळला म्हणजे मुंबई ला खेळणार हे समीकरणच झालं होत. असं म्हणतात कि कुठल्याही दौऱ्या वरून कधीही परत आले तरी दुसऱ्या दिवशी युनियन च्या सामन्यासाठी गावस्कर हजर असायचे, हीच इथल्या लालमातीची, आमच्या पार्काची, आमच्या दादर ची गोडी. मुंबईच्या मानाच्या कांगा लीग मध्ये युनिअन चा दबदबा होता..

युनिअन च्या रविवारच्या सामन्यांसाठी तर तौबा गर्दी व्हायची. माधव मंत्री, वासू परांजपे, गावस्कर, वाडेकर, वेंगसरकर, मांजरेकर हि दादा मंडळी मैदानात असताना अजून काय होणार. आजही युनिअन चा संघ तीच ऐट तोच रुबाब मिरवतोय, आधी सारखी दादागिरी ह्या संघाला जमत नसली तरीही आम्ही गावस्कर, मांजरेकरांचे वारसदार आहोत हे छातीवर मिरवत हा संघ झुंजताना दिसतो. दादर ची युनियन आणि युनियन चं क्रिकेट..

क्रिकेट म्हणजे दादर आणि दादर म्हणजे क्रिकेट

आजही मुंबईतल्या कुठल्याही कोपऱ्यात जेव्हा गल्लीत खेळणारा कोणी खेळाडू तंत्रशुद्ध आणि प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं निश्चित करतो, तेव्हा त्याचं पहिलं पाऊल शिवाजी पार्कवर पडतं. पहिला गार्ड, पहिला रन उप इथल्या लाल मातीवर नोंदवला जातो. इथे आजही कित्येक तेंडुलकर, गावस्कर खेळताना दिसतात, घडताना दिसतात. उद्या क्रिकेट च्या पटलावर कोणी दादा खेळाडू उदयास आला आणि “मी युनियन चा, मी शिवाजी पार्कचा, मी दादरचा” अशी ओळख सांगितली तर नवल वाटून घेऊ नका. कारण क्रिकेट म्हणजे दादर आणि दादर म्हणजे क्रिकेट..!! शिवाजी पार्क वर सूर्यास्त भारी दिसतो, कित्येक अस्त ह्या पार्कने पाहिले पण क्रिकेटचा सूर्य इथे आजन्म तळपत राहील हि खात्री आहे..!!

दादरमुंबईकर प्रेमी :- मल्हार शेलार   
छायाचित्र : अभि पाटील 

Most Popular

Recent Comments