गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन. मागील ५५ वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेने अनेक चढउतार पाहिलेत. आता शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. बदलत्या काळानुसार शिवसेना ही आपले रूप बदलत आहे. पाहुयात मागील ५५ वर्षांमधील शिवसेनेचा प्रवास…
शिवसेनेची स्थापना –
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकत्र आलेला मराठी आवाज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मात्र काहीसा विखुरला गेला होता. मराठी मुलुखात मराठी माणसाचीच अवहेलना, कुचंबना होत असल्याच्या धर्तीवर त्याच सुमारास सुरु झालेल्या मार्मिक या साप्ताहिकातून प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी तरुणांच्या मनातील खदखद जाणून आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य हाती घेतले. बाळासाहेबांच्या या कार्यास लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असावी या विचारातून १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या जन्माची बीजे मार्मिक साप्ताहिकामध्ये रुजली होती असे म्हणता येईल. मराठी माणसाचे प्रश्न मार्मिकमधून सतत अधोरेखित केले गेले.
ग्रेटव्यक्ती – मुंबईच्या अनेक दिग्गजांना भुरळ पाडणारा ‘दादरचा बबन चहावाला’
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा –
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. शिवतीर्थावर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘हा बाळ मी आज तुम्हाला दिला’ असे उद्गार काढले. मराठी लोकांनी या ‘भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना’ म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचे सदस्यत्व मिळावे यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली. मराठी मनाचा मानबिंदू असणारी शिवसेना आज पन्नाशी पल्याड शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आगेकूच करीत आहे.
महापालिकांचे राजकारण आणि महापौर-
शिवसेनेने १९६७ साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारणात प्रवेश केला. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार देखील केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. १९६८ साली मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला १९७१ साल उजाडले. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले. तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या. शिवसेना शाखेत आपले प्रश्न सोडवण्याचे एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले.
शिवसेनेच्या गुप्ते यांच्यानंतर मुंबईत अनेक महापौर झाले. त्यामध्ये सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडीक, छगन भुजबळ, दत्ता नलावडे, रमेश प्रभू, सी. एस. पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्वर पाटील, महादेव देवळे, दत्ता दळवी, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर, आणि विद्यमान किशोरी पेडणेकर असे महापौर झाले आहेत. यातील काही महापौरांना काँग्रेसचा तर काही महापौरांना भाजपाचा पाठिंबा मिळाला. सध्या १९६८ पासून शिवसेनेचे महापौर मुंबईत आहेत.
भाजपसोबत युती –
शिवसेनेने १९८४ साली भाजपबरोबर युती केली. परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली. तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. १९८९ साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली ती २५ वर्षे टिकली.
शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि विधानसभेवर भगवा –
पहिल्यांदाच महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीची सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मात्र २०१९ साली शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले.
बाळासाहेबांचे निधन आणि उद्धव यांच्याकडे पक्षसूत्रे –
महाबळेश्वर येथे २००३ साली झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर २००५ साली राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यांनंतर उद्धव यांच्याकडे सर्व सूत्रे आली.
निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करता कोणतेही पद घेणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या ठाकरे घराण्यातील दोन नेते विधिमंडळात आहेत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेत निवडले गेले आहेत.