चित्रा सिनेमा chitra cinema सारखं मुंबईतलं एक सिंगल स्क्रीन थिएटर बंद झालंय. आता लवकरच ती इमारत पडेल आणि त्या पाठोपाठ पडत राहतील मुंबापुरीतली हाताच्या बोटांवरच मोजण्याइतकी उरलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स. अन तिथे उभी राहतील एकएक अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स. या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येच सर्वात वरच्या मजल्यावर असेलही एखादं तीन किंवा पाच किंवा सात स्क्रीन्सचं अद्ययावत मल्टिप्लेक्स… पण तरीही त्या मल्टिप्लेक्सला कधीच सिंगल स्क्रीन थिएटरची मजा येणार नाही.
इंटर्व्हलमध्ये चहा-समोस्या वगैरे पदार्थांऐवजी कॅप्युचिनो/एक्सप्रेसो किंवा मग एखाद्या कोल्ड ड्रिंक सोबत बर्गर, पिझ्झा वगैरे डिशेस ऑर्डर केल्या जातील. किंवा मग इंटर्व्हलनंतर बॉक्समध्ये एन्टर करताना हातात असतील पॉपकॉर्न टब किंवा कोन, पण तरीही त्या मुव्हीला कधीही सिनेमाइतका जिवंत प्रतिसाद लाभणार नाही. फिल्लीम बघता बघता कुणीही टाळ्या-शिट्ट्या वाजवणार नाहीत. पडद्यावर दिसणाऱ्या मुलींच्या दिसण्यावरून भरथिएटरला इतक्या दणदणीत आवाजात शेलक्या शब्दांत प्रतिसाद दिले जाणार नाहीत. अगदी एखाद्या गंभीर सिनला मोठ्या आवाजात झालेल्या विनोदी टिपण्णीमुळे बॉक्समधून हास्याची कारंजी उडणार नाहीत. अगदी विनोदपट बघतानाही कुणीही खो खो हसणार नाही. फिल्ममधल्या एखाद्या मोमेंटवरची दाद ही गालांतल्या गालांत, ओठांतल्या ओठांतच सगळ्यात आधी उमटेल. आणि मग ती उमटेल थेट फेसबुक किंवा तत्कालीन सोशल पोर्टल्सवर. ( चित्रा सिनेमा chitra cinema )
हेही वाचा : शिवाजी मंदिर नाट्यगृह – मुंबई आणि अवघ्या मराठी नाट्यमृष्टीचे भूषण
फार फारतर कुठल्यातरी कॉलेजमधले बंक मारून फिल्मला आलेले ग्रुप्स आपापसात विनोद करत हसतील, खिदळतील पण ते ही एका लिमिटपर्यंतच! कारण त्यांच्या तारुण्याआधीच त्यांच्यात इंजेक्ट झालेलं असेल सोफेस्टीकेशन. त्यांनाही लागली असेल हवा समृद्धीची. त्यांनाही असेल भूक विकासाची.
पण आपण या भुकेपायी, या हवेपायी आणि या इंजेक्शनपायी गमावलं असं काहीतरी जे आपल्याला माणूस म्हणून सळसळत ठेवत होतं, उत्साहात खळाळत ठेवत होतं हे लक्षात येऊन हळहळत असू आम्ही तेव्हा पिकून म्हातारे झालेले आजचे तरुण, पण ते हळहळणं सुद्धा वांझ असेल. आणि तीच असेल आमच्या वेळीच न सावरण्याची शिक्षा!
तुमच्या मनातल्या थिएटरच्या पडद्यावरही आल्याच असतील काही आठवणी जिवंतपणाच्या, कधी काळी आयुष्याचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या सिंगल स्क्रीन थिएटरच्या. बघा आठवून.
-सर्वेश शरद जोशी
हेही वाचा : शिवाजी पार्क – क्रिकेट म्हणजे दादर आणि दादर म्हणजे क्रिकेट..!!