Monday, December 2, 2024
Homeआपली मुंबईग्रेटव्यक्ती - मुंबईच्या अनेक दिग्गजांना भुरळ पाडणारा 'दादरचा बबन चहावाला'

ग्रेटव्यक्ती – मुंबईच्या अनेक दिग्गजांना भुरळ पाडणारा ‘दादरचा बबन चहावाला’

दिल्ली असो वा कुठल्याही शहरातली, गावखेड्यातली गल्ली असो.... चहा आणि चहावाला सध्या सगळीकडे यांचीच चर्चा. मुंबईत चहाप्रेमींची कमी नाही म्हणून तर सध्या गल्लोगल्ली अमृततुल्य चहांच्या शाखांचं फॕडच निघालय.

( ग्रेटव्यक्ती – बबनचहावाला ) वेळ, ठिकाण, निमित्त कुठलंही असो चहा हा हवाच. विषय कुठलाही असो गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, साहित्य वा अन्य कुठलाही. चर्चेला बसायचं म्हणजे चहा हवाच. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. या चहाची भुरळ कुणाला पडली नाही !

एकेकाळी मुंबईच्या दादर पश्चिमेस अशाच एका चहावाल्याने अन् त्याच्या चहाने दिग्गज रात्रपाळीतले पत्रकार , विविध पक्षांतील कार्यकर्ते, साहित्यिक, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, नाट्य- चित्रपट कलावंत, व्यापारी, पोलिस ते अगदी भिकारी अशांना भुरळ घातली होती. यांच्या चहाची भुरळ दिग्गज पत्रकार चंदू कुलकर्णी, अंबरीश मिश्र, संदीप आचार्य, निशांत सरवणकर, संजय राऊत अन् नाट्य- चित्रपट अभिनेते विवेक, नाना पाटेकर, सतिश पुळेकर यांना पडली होती. गुजराती शेठजींबरोबर त्यांच्या बायकाही बबन काकांच्या चहाच्या स्टाॕलवर चहा प्यायला यायच्या तेव्हा शेठजी गमतीने त्यांच्या बायकांना ‘बबन जैसा चाय तुम नही बना सकती’ अशी गमतीवजा तक्रार करत. एक वेळ अशी होती कि तेव्हा दादर पश्चिमेस बबन चहावाला यांच्या चहाचं साम्राज्य चालायचं. रात्रपाळीचे पत्रकार, साहित्यिक, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, नाट्य – चित्रपट कलावंत यांचं चहाचा घोट घेता घेता चर्चा करण्याचंं हे एकमेव हक्काचं ठिकाण. अनेकविध विषयांवर येथे संध्याकाळपासून ते अगदी सकाळच्या पहिल्या लोकलपर्यंत चर्चा रंगायच्या ज्यात चहा बनवता बनवता बबनजीसुद्धा रमून जायचे.

हेही वाचा – बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकांचे घर

कौटुंबिक पार्श्वभूमी –

बबन चहावाला हे मुळचे सोलापूरकर. सावरगाव हे त्यांचं गाव. त्यांचं मूळ नाव बबन केमकर. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते गेली ३८ वर्षे या व्यवसायात आहेत. सध्या ते रहायला हिंदू काॕलनी येथे टिळक ब्रिजखाली आहेत. तेथे त्यांचे छोटेसे स्टेशनरीचे दुकान आहे. पूर्वी याच ठिकाणी त्यांच्या वडीलांचे बूट रिपेअरिंगचे दुकान होते. त्यांची पत्नी आणि दोन मुलगे हे सध्या टिटवाळ्यातील घरी वास्तव्यास आहेत पण बबन काका आजही दादरमधेच रमतात. त्यांच्या दोन मुलांपैकी मोठ्या मुलाने इंजिनिअरिंगमधे बी सिव्हील केलं आहे आणि दुसरा मुलगा बी. काॕम पर्यंत शिकून कॕपजेमिनी कंपनीत कार्यरत आहे.

बबन काकांनी आता वयाची अडसष्टी गाठली आहे. चर्चा कुठल्याही विषयावर असो. बबनजी चर्चेसाठी सदैव सज्ज. त्यांची चाॕकलेट चहा, उकाळा, बटाटा पोहे हि खासियत. त्यांचा चहाचा व्यवसाय सध्या त्यांनी चालवायला दिला आहे. बबन काकांचे शिक्षण जेमतेम दहावी पर्यंत जवळच्याच राजा शिवाजी विद्यालयात झाले. शेवटच्या बाकावर बसून झोपा काढणारे बॕक बेंचर्स म्हणून ते शाळेत प्रसिध्द होते. आई लहानपणीच वारलेली त्यात वडीलांनी घराबाहेर काढलेले बबन काका दादर स्टेशनजवळच्या कांदा बटाटा मार्केटमधल्या खोक्यांवर पडून रात्र काढायचे. मग थोडे पैसे जमा झाल्यावर सामंत लोणीवाल्याच्यावर जो विष्णू लाॕज आहे तेथे रहायला गेले. तेथे त्यांची ओळख पापे नामक फिल्मी फोटोग्राफर अन् रामेश्वर त्यागी नामक दिल्लीतील गीतकाराशी झाली. त्यांच्यासोबतच्या गप्पा गाण्यांतून विरंगुळा होत असे. १९३२ साली बबन काकांचं लग्न वडिलांनी लावून दिलं त्यानंतरच त्यांना घरात घेतलं.

 ग्रेटभेट-baban-chaiwala
चंदन विचारे बबन यांच्यासोबत
चहा स्टाॕलची सुरुवात –

१९६६ मध्ये मुंबईत शिवसेनेचे वारे वाहू लागले. बबन काका हे त्यावेळचे शिवसैनिक. भिंतीवर पोस्टर्स लावणे, स्लीपा वाटणे, बोर्ड रंगवणे अशी कामं ते आठवीत असताना करत असत. कामे आटोपली कि पोटाची खळगी भरायला कार्यकर्त्यांंची गँग दादर स्टेशनवर येत असे. त्यावेळी विजू समेळ आणि अशोक वैद्य यांचा स्टेशनजवळ बटाटेवड्याचा गाडी लागे. सावंतांची फ्रुट प्लेटची गाडी होती. त्यांनीच या कार्यकर्त्यांना  “जागा देतो धंदा लावणार का ?” असे विचारले. त्यावेळी बाळासाहेबांचे हटाव लुंगी बजाव पुंगी हे आंदोलन जोरात होते. ( ग्रेटव्यक्ती – बबनचहावाला )

बबन काकांनी मित्रांकडून पैसे आणि व्यवसायासाठी लागणारे सामान गोळा करुन चहाच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चहाची किंमत एक आणे इतकी होती. बबन काका चहाच्या स्टाॕलवर उकाळा, मसाला चहा , चाॕकलेट चहा, बटाटा पोहे विक्रीसाठी ठेवत असत. त्यात त्यांचा चाॕकलेट चहा विशेष प्रसिध्द. रात्री ९ ते सकाळी ६ हि त्यांची चहा व्यवसायाची वेळ. हे सगळं करुन ते सकाळी अकरा वाजता शाळेत जायचे.

 सेवाधर्म –

बबन काका चहाच्या व्यवसायाइतकेच त्यांच्या समाजसेवेविषयीही ओळखले जायचे. परगावहुन आलेल्या एका कुटुंबियांना चोरांनी लुटल्याचे कळल्यावर बबन काकांनी पैसे जमवून त्या कुटुंबियांस परतीचे तिकीट काढून देऊन परत पाठवले. के.ई.एम रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या एका रुग्णाची दुधाची निकड बबन काकांनी भागवल्याचे कळते.

वर्तमानपत्रे लेख आणि पुस्तकांतील उल्लेख –

बऱ्याच पत्रकारांनी त्यांच्यावर वर्तमानपत्रात बरेच लेख लिहिले आहेत. तर कित्येक लेखात त्यांचा उल्लेख केला गेला आहे. चहाविषयी ब्लाॕग लिहीणाऱ्या बऱ्याच ब्लाॕगर्सपासून ते चित्रपट कलावंतांनीही बबन चहावाला यांच्याविषयी बरंच लिहीलं आहे. प्रसिद्ध निवेदक , मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या मुद्रा या पुस्तकात बबन केमकर यांच्या व्यक्तिचरित्राविषयी लिहीलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता श्री. चिन्मय मांडलेकर यांनी एका लेखात बबन चहावाला यांचा उल्लेख केल्याचं श्री. आनंद शिंदेंनी सांगितलं. ( ग्रेटव्यक्ती – बबनचहावाला )

वाचनाची आवड –

बबन काकांना वाचनाची आवड आठवीत असताना लागली. त्यावेळेस मराठा, नवाकाळ, लोकसत्ता या वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचणे हा त्यांचा सुरुवातीचा छंद. शिवाजी सावंत यांचे मृत्यूंजय आणि क्षीरसागरांचे परकायाप्रवेश या पुस्तकांनी त्यांना पुस्तक वाचनाचे वेड लावले. त्यांच्याकडे असणारा पुस्तक संग्रह हा शेकड्यात आहे. त्यांचा ओढा विशेषतः अध्यात्माकडे आहे. विविध विषयांवरच्या पुस्तकांचं वाचन, त्याविषयीची मार्मिक टिप्पणी याविषयी बबन केमकर विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे मित्र शशिकांत सावंत यांनी त्यांना कुमार गंधर्व यांची निर्गुण भजन नावाची कॕसेट भेट दिली. त्यांच्यामते कबीरांची शैली आणि कुमार गंधर्वांची निर्गुण भजने एकाच शैलीतली. संत कबीर , संत तुकाराम , ज्ञानेश्व माऊली, ओशो यांच्यासंबधीच्या पुस्तकांची तर बबन काकांनी पारायणे केली आहेत. ( ग्रेटव्यक्ती – बबनचहावाला )

ग्रेटभेट –

काही दिवसांपूर्वी माझ्या परिचयाचे श्री. आनंद शिंदे यांच्यासोबत श्री. बबन केमकर यांच्या हिंदू काॕलनीतील दुकानावर गेलो होतो पण तिथे त्यावेळी त्यांची भेट झाली नाही. आज मात्र त्यांच्या घराजवळून जात असताना सहज आठवण आली अन् बबन केमकरांच्या दुकानात डोकावून पाहिलं तर ते आत होते. मग काय विचारता. दुकानाबाहेर खुर्च्या टेबल मांडले अन् गप्पांना सुरुवात झाली. यावेळी माझी चहाची तलफ बबन केमकरांनी ताकावर भागवली. ( ग्रेटव्यक्ती – बबनचहावाला )

खूप छान वाटलं बबन केमकर उर्फ बबन चहावाला यांना भेटून. निरोप घेताना बबन काकांनी तरुणांसाठी एक छानसा संदेश दिला तो म्हणजे, कुठल्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जा.

आमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा. 

Most Popular

Recent Comments