इथला मराठी कामगार देशोधडीला लावण्यात आला ,कुटुंबासकट त्याला परागंदा व्हायला लागलं.इथल्या पक्षप्रेरित कामगार यूनियन्स ने सुद्धा त्याचे लचके तोडले आणि इथल्या राज्यकर्त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडले!
पण काही माणसं स्वतः कुठेही प्रकाश झोतात न येता इतिहास घडवतात .ज्या शहरात इंचभर जागेसाठी सुद्धा बिल्डर राजकारणी लॉबीला तोंड द्यावे लागते त्या मुंबई शहरात गिरणी कामगारांसाठी घरांसाठी जागा मिळवणे हे अत्यंत अविश्वसनीय काम ज्या मूठभर ध्येयवेड्या लोकांनी केलं त्यातले अग्रगण्य नाव म्हंणजे “दत्ता इस्वलकर”
हेही वाचा: श्री स्वामी समर्थ मठ (shree swami samrtha math)- दादरमधील १०० वर्षांहून जुने मठ
“पण काय आहे सुर्वे कुणीतरी लढायला हवंच!”
भांडीकुंडी विकून गावाकडे परतलेल्या या इथल्या भुमीपूत्र गिरणी कामगारांना ताठ मानेने पुन्हा मुंबईत स्वतःची जागा मिळवून देण्यासाठी “गिरणी कामगार संघर्ष समिती” च्या माध्यमातून दत्ता भाऊ आणि प्रवीण घाग यांची टीम लढली. वडिलांना आणि त्यांच्या मित्राला (सुर्वे यांना)भेटायला ते कधीतरी घरी आले होते ..अंगात साधा शिवलेला शर्ट (मिलच्या कापडाचा) आणि मळखाऊ पॅण्ट ..हातात प्लास्टिक ची पिशवी …त्यांच्या बोलण्यात फक्त आणि फक्त गिरणी कामगार हाच विषय होता..तावातावाने बोलत होते..न्याय ..हक्क संघर्ष …त्यांच्या पिकल्या केसातून वेगळीच चमक दिसत होती..निघताना प्लॅस्टिक च्या जीर्ण चपला घालताना त्यांनी एक मोठा सुस्कारा टाकला आणि म्हणाले होते “पण काय आहे सुर्वे कुणीतरी लढायला हवंच!
अशी माणसे विस्मरणात जात कामा नये..!
त्यांच्या जाण्याने आज वडील डोळ्यासमोर आले! मला माहितीय कि आज कित्येक गिरणी कामगारांना त्यांचे वडील डोळ्यासमोर आले असतील! गेल्याच आठवड्यात नव्या गिरणी वसाहतीत राहणाऱ्या एकाला विचारत होतो ..तुम्हाला इतक्या कमी रेट मध्ये मुंबईत हक्काचं घर मिळालं कधी एक पेढ्याचा बॉक्स घेऊन दत्ता इस्वलकरांकडे किंवा प्रवीण घाग यांच्याकडे जावंसं नाही वाटलं का ? त्यावर तो खजील हसला!
स्वतः इस्वलकरांना देखील श्रेयाचा हव्यास नव्हता…पण म्हणून अशी माणसे विस्मरणात जात कामा नये..!
ज्यांच्या समोर लोळण घालून साष्टांग नमस्कार करावा अशी दुर्मिळ माणसं आजूबाजूने कापरा सारखी उडून जाण्याच्या या काळात शोषितांच्या,दुर्बलांच्या न्यायासाठी उठणारा एक बुलंद आवाज मिल च्या भोंग्या सारखा आता नष्ट झालाय!
कामगार लढ्याचा शेवटच्या निखाऱ्यां मधला एक निखारा थंड पडला!
गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन- मुंबईतली ऐतिहासिक गिरण्यांच्या संपात वाताहत झालेल्या गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावी, यासाठी लढा उभारणारे कामगार नेते दत्ता इस्वलकर, यांचे आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन..!
दत्ताजी, तुम्ही अमर आहात. गिरणी कामगारांना त्यांची हक्काची घरं मिळावीत म्हणून तुम्ही दिलेला लढा सर्वसामान्य मुंबईकर कधीही विसरणार नाहीत..!!
आमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा.