Monday, December 2, 2024
Homeआपले दादरसांस्कृतिक दादरमहाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरचा

महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरचा

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही.

साधारण १९२३-१९२४ दरम्यानचा तो काळ. त्याकाळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त गणेशोत्सव साजरा केला जायचा. प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहादूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने ‘लोकहितवादी’ या संघाच्या माध्यमातून १९२६ मध्ये महाराष्ट्रातील पहिला ‘श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव’ दादरमध्ये काळं मैदान येथे सुरु करण्यात आला. प्लाझा सिनेमासमोर असलेले हे मैदान आता वीर कोतवाल उद्यान म्हणून परिचित आहे. काही वर्षांनंतर हा उत्सव दादर येथील खांडके चाळीत स्थलांतरित झाला. आजही दादर परिसरात खांडके चाळीत हा उत्सव तेवढ्याच उत्साहात आणि श्रद्धेने साजरा होतो.

हेही वाचा: शिवसेना आज ५५ वर्षांची झाली !!

१९२६ च्या पूर्वी मुंबईत व महाराष्ट्रात कोठे प्रघात नसलेला श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरने मिळवला. काळया मैदानावर ८० फूट लांब आणि ६० फूट रुंद विशाल मंडप उभारण्यात आला होता. या पहिल्या शिवभवानी नवरात्रोत्सवात भवानी मातेच्या मूर्तीसाठी राजा रवी वर्मांच्या कालीदेवीच्या तांडवनृत्याचा कट आऊट तयार करण्यात आला होता.

सार्वजनिक नवरात्र उत्सव prabodhankar thackeray navratri festival
दादरमधील खांडके चाळीतील शिवभवानी नवरात्रोत्सव

अशा प्रकारे साजरा केला गेला नवरात्र उत्सव 

शेजारी दोन्ही बाजूस पुरुषभर उंचीच्या दोन समई मांडण्यात आल्या होत्या. त्यावेळेस गिरगावातल्या मूगभाटातील वाजंत्री मंडळींनी सनई-चौघडे वाजवण्याची जबाबदारी घेतली होती. तर रावसाहेब बोले यांनी पहिल्या वाहिल्या शिवभवानी नवरात्रोत्सवात अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती.

आश्विनशुद्ध प्रतिपदेच्या दिनी आमदार सोळंकी यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारण्यात आला होता. सर्व विधी दादरमधील विख्यात गुरुजी पालवेशास्त्री यांच्या मंत्रोच्चारांत पार पाडले. कविवर्य वसंत बिहर ऊर्फ जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या जगदंबेच्या आरतीचे आबालवृद्धांनी सुरात गायन केले. भायखळा भाजी मंडईतील भाजी विक्रेत्या यमुनाबाई घोडेकर यांचे व्याख्यान तेव्हा गाजले होते. सुमारे तीन तास यमुनाबाई जीवनविषयक आपले विचार मांडत होत्या.

पुढे तीन वर्षे १९२९ पर्यंत हा उत्सव प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिला. पुढे १९२९ सालापासून १९४० सालापर्यंत हा नवरात्र उत्सव खांडके बिल्डींगच्या पटांगणात साजरा होऊ लागला. त्यानंतर दादरमधील खांडके चाळीतील रहिवाशांनी शिवभवानी नवरात्रोत्सवाची ही परंपरा आजवर जपली आहे. कधी दादर पश्चिमेला आलात तर या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आई भवानीचे दर्शन नक्की घ्या.

 

संदर्भ : माझी जीवनगाथा – प्रबोधनकार ठाकरे, मनोहर जोशी यांचे लेख, समीर परांजपे

Dadarmumbaikar – आमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा. 

 

Most Popular

Recent Comments