मुंबई आणि अवघ्या मराठी नाट्यमृष्टीचे भूषण ठरावे असे शिवाजी मंदिर हे प्रामुख्याने नाट्यप्रयोग करणारे सुसज्ज नाट्यगृह दादरमध्ये आहे. हे नाट्यगृह ३१ डिसेंबर १९४३ रोजी स्थापन झालेल्या श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, मुंबईतर्फे चालविले जाते.
श्री शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य जनतेमध्ये स्वातंत्र्यलालसा निर्माण व्हावी. भारताचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बहुजन समाज सुसंघटित आणि बळकट व्हावा हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून या मंडळाचा उदय झाला. त्याचप्रमाणे श्री शिवप्रभूंचं स्मारक महाराष्ट्राच्या राजधानीत – मुंबईत – व्हावं, हा हे मंडळ स्थापण्यामागचा उदात्त हेतू होता. या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले ते पुढे काही वर्षांनी म्हणजे ३ मे १६६५ रोजी, महाराष्ट्र राज्याचे त्या वेळचे गृहमंत्री मा. बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते. मात्र शिवाजी मंदिर नाट्यगृह सुरू होण्यापूर्वीही इथे जनतेसाठी खाजगीरित्या नाट्यप्रयोग, भजने, दशावतार इ. होत.
शाहीर आत्माराम पाटील यांच्या आठवणीप्रमाणे, ‘दादरला ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरे होत असत. त्या ठिकाणी हौशी नाटक मंडळी नाटकेही सादर करीत. क्वचित दशावतारी खेळ होत आणि सार्वजनिक तसेच खाजगी पूजा वगैरे ठिकाणी हातिसकर बुवा, दीक्षित, साटम, स्नेहल भाटकर इत्यादींची भजने होत असत. शिवाजी मंदिर हे आशिया खंडातील आदर्श नाट्यगृह आहे. येथीलध्वनिनियोजन निर्दोष आणि दर्जेदार आहे. आसनांची मांडणी विशेष काळजी घेऊन कल्पकतापूर्वक केलेली आहे. त्यामुळे या नाट्यगृहात एक हजार बत्तीस प्रेक्षकांना कुठेही बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो.
संदर्भ आणि साभार : दासावा , श्री अशोक बेडखळे