Saturday, September 21, 2024
Homeआपली मुंबईआद्य चित्रपटांची जन्मभूमी मुंबई आणि मराठी माणूस !

आद्य चित्रपटांची जन्मभूमी मुंबई आणि मराठी माणूस !

सिनेमा मराठीतून बोलू लागला ते वर्ष होते १९३२. पहिला मराठी बोलपट होता ‛अयोध्येचा राजा ’ आणि ही होती मराठी चित्रपटाच्या इतिहासाची सुरुवात. परंतु इतिहास उभा असतो तो त्याच्या पूर्व इतिहासाच्या खांद्यावर. मराठी बोलपटांआधी कोणत्याही एका बोली भाषेचे स्वामित्व नसणारे असे मुकपट.  म्हणूनच मुकपटांवर मालकी होती साऱ्या जगाची…म्हणूनच ल्युमिए या फ्रेंच बंधूंनी तयार केलेला मुकपट देशमागून देश ओलांडत अवघ्या सहा महिन्यात भारतात अवतरला. आद्य चित्रपटांची जन्मभूमी मुंबई

आद्य चित्रपटांची जन्मभूमी मुंबई
वॅटसन्स हॉटेलची इमारत

आद्य चित्रपटांची जन्मभूमी मुंबई : मंगळवार,७ जुलै १८९६ रोजी संध्याकाळी मुंबईच्या काळा घोडा परिसरातील वॅटसन्स हॉटेलमध्ये ल्युमिए बंधूंच्या चित्रपटांचा खेळ, म्हणजेच जगातील पहिल्या चित्रपटाचा खेळ झाला. त्यावेळच्या वॅटसन्स हॉटेलची इमारत आता ‘ एस्प्लनेड बिल्डिंग ‘ म्हणून ओळखली जाते.  या खेळाचे तिकीट एक रुपया हे त्या काळाचा विचार करता महागडेच होते. प्रेक्षक होते अर्थातच वॅटसन्स हॉटेल मध्ये नेहमी येणारे ब्रिटिश उच्च अधिकारी आणि उचभ्रू श्रीमंत भारतीय. दिवसाला संध्याकाळी ६,७ आणि रात्री ९,१० असे चार खेळ होऊ लागले.

ल्युमिए बंधूंचे मूकपट मुंबईत दाखवले जाऊ लागले. १५ ऑगस्ट १८९६ पर्यंत ल्युमिए बंधूंचे मुंबईत शो सुरू होते. मुंबईत सिनेमाचा मोठा प्रेक्षकवर्ग तयार होऊ लागला होता. ल्युमिए बंधूंचे मुकपट पाहून त्यापासून प्रेरणा घेऊन स्वतः चित्रपट बनवण्याचा पहिला प्रयत्न करणारा भारतीय ठरला एक मराठी माणूसच !

lumiere brothers, Watson hotel

हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावे दादा.

विदेशी प्रदर्शक हिंदुस्तानात चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग तयार करू लागले असतानाच या प्रदर्शन व्यवसायाची धुरा हाती घेणारे सावेदादा पहीलेच भारतीय ठरले. वॅटसन हॉटेलमध्ये ल्युमिए बंधूंच्या सिनेमाचे खेळ पाहून त्यातून चित्रपट बनवण्याची प्रेरणा घेतली. या खेळांनी त्यांना एक नवी दिशा दाखवून प्रयोगासाठी उद्युक्त केले आपण असे चलचित्रांचे खेळ दाखवावे असा असे त्यांना वाटू लागले. मुंबईतल्या श्रीमंत कुटुंबातून या चित्रपटांचे खेळ वाढदिवसादि, विशेष समारंभाप्रसंगी करू लागले. सावे दादा यांनी 1898 मध्ये मुंबईच्या हँगिंग गार्डन मध्ये दोन पैलवानांच्या कुस्तीचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर माकडवाला आणि त्याचे माकड याचे चित्रीकरण केले.  विसावे शतक सुरू होण्यापूर्वी नोव्हेंबर 1899 मध्ये सावे दादा यांनी आपले दोन्ही चित्रिकरण मुंबईत प्रदर्शित केले. 

रघुनाथ परांजपे  ‘ रॅग्लर ’ ही पदवी संपादन करून हिंदुस्थानात परतले तेव्हा उद्योजक नरोत्तम मोरारजी गोकुळदास यांनी आपल्या पेडर रोड स्थित निवासस्थानी त्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला. या समारंभाला गोपाळ कृष्ण गोखले आणि सर भालचंद्र भाटवडेकर हे उपस्थित होते. यांनी सत्कार समारंभाचे चित्रीकरण करून ‘ द रिटर्न ऑफ रॅग्लर परांजपे’ या नावाने  तो  चित्रपट 1902 च्या फेब्रूवारीमध्ये  दाखवला. भारतात तयार झालेला हा पहिला माहितीपट!!

हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावे दादा.
हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावे दादा.

दादासाहेब तोरणे आणि “श्री पुंडलीक “

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी बनवलेला “राजा हरिश्चंद्र” हा पहिलावहिला भारतीय मूकपट ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र मुंबईच्या ज्या ‘कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ’मध्ये ३ मे रोजी दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ प्रथम दाखवला गेला. त्याच सिनेमागृहात जवळजवळ वर्षभर आधी, म्हणजे १८ मे १९१२ रोजी रामचंद्र गोपाळ उर्फ दादासाहेब तोरणे यांनी तयार केलेला ‘श्री पुंडलिक’ दाखवला गेला होता. गिरगावात श्रीपाद संगीत नाटक मंडळी हौशीनाट्यसंस्था होती. श्रीपाद संगीत नाटक मंडळी रामराव बाळकृष्ण कीर्तिकर लिखित भक्त पुंडलिक या नाटकाचे सादरीकरण करीत असत. मुंबईच्या ग्रीव्हज कॉटन कंपनीत नोकरीला असलेले मालवणचे रामचंद्र गोपाळ उर्फ दादासाहेब तोरणे याचा नाट्यसंस्थेशी परिचय होता. एखाद्या नाट्यप्रयोगाचे चित्रीकरण करून पाहावे असं त्यांना वाटू लागलं.

दादासाहेब तोरणे
दादासाहेब तोरणे

कोरोनेशन थिएटर

मुंबईत ग्रँट रोडला आता जिथे नाझ , इम्पिरियल आणि स्वास्तिक सिनेमागृहे आहेत तो भाग म्हणजे त्यावेळी सर मंगळदास नथुभाई यांच्या मालकीच्या मोकळा मैदानाचा होता. तिथेच चित्रीकरण झाले. काही थोडे चित्रीकरण आज जिथे त्रिभुवनदास रोड आणि विठ्ठलभाई पटेल रोड आहेत तिथे झाले. दिग्दर्शक अर्थातच दादासाहेब तोरणे ! पण दिग्दर्शकाला कामच नव्हतं. यातील पात्र नाटकाप्रमाणे एक्झिट एन्ट्री घेत व कॅमेरा समोर येऊन अभिनय करीत. कॅमेरा एका जागी स्थिर ठेवलेला असे. मुंबईत आता जिथे पारेख हॉस्पिटल आहे. तिथे नानासाहेब चित्र्याचं कोरोनेशन थिएटर उभ राहिल होत. दादासाहेब तोरणे यांचा ‛ पुंडलिक ’ १८ मे १९१२ रोजी कोरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याकाळी भारतात वितरण व्यवस्था नसल्याने पुंडलिक फक्त मुंबईतच दाखविला गेला त्यामुळे त्याला हवी तेवढी प्रसिद्धी मिळू शकली नाही किंवा याचा उल्लेख नाही असं काहीच नव्हतं. याला चित्रपटाचं कोणताही तंत्र नव्हतं. हा चित्रपट म्हणजे रंगभूमीवरच्या नाटकाचे चित्रीकरण होते चित्रपटाच्या पटकथेचे परिमाण त्याला नव्हते.  

पाटणकर, करंदीकर आणि दिवेकर

चित्रपटाचे नवे क्षेत्र मराठी तरूणांना खुणावू लागले होते. १९०७ साली पाटणकर ,करंदीकर आणि दिवेकर या त्रयीने सावे दादांकडून  रिले कॅमेरा  विकत घेतला. या त्रयीचा संबंध चित्रपट प्रदर्शनाच्या क्षेत्राशी आलेला होता. पाटणकर हे मुंबईतील सँड हस्र्ट रोड  गिरगाव परिसरातील कोरोनेशन चित्रपटगृहाचे व्यवस्थापक होते. तर करंदीकर आणि दिवेकर हे या चित्रपटगृहाच्या सुशोभीकरणाचे काम करीत असत. कोरोनेशन थिएटरने भारतीय सिनेमा व्यवसायाच्या  इतिहासात फार मोठी भूमिकापार पडली आहे. आद्य चित्रपटांची जन्मभूमी मुंबई

दादासाहेब फाळके यांच्या मुकपटात प्रतिबिंबित होणारी मराठी संस्कृति

आज भारत हा जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. भारताला त्याचा सिनेमा दिला एका मराठी माणसाने ! धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांनी !पश्चिमेकडे नव्याने जन्माला आलेल्या चित्रपटांच्या तंत्राचा आणि चित्रपटाच्या भाषेचा वापर संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञ-कलावंताना हाताशी धरीत, दादासाहेब फाळके यांनी सातत्याने चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपटाच्या या नव्या माध्यमाला जाणीवपूर्वक देशी चेहरा दिला. चित्रपटाला भारतीय व्यवसाय म्हणून त्याच्या शक्यता ओळखल्या, त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी अविरत धडपड केली. चित्रपटाला भारतीय व्यवसाय म्हणून स्थपित करताना दादासाहेब फाळके यांच्या मुकपटात प्रतिबिंबित होणारी मराठी संस्कृति देशभर पोहोचू लागली होती ! राजा हरिश्चंद्र मधील व्यक्तिरेखा बोलू शकत नव्हत्या.. पण त्याची रुपे सजली होती ती नखशिखांत मराठी संस्कृतीतच. भारताचा पहीला चित्रपट हा मराठी संस्कृतीची जीवनलेणी लेवूनच अवतरला होता.

raja harishchandra
राजा हरिश्चंद्र चित्रपट

ल्युमिए बंधुपासून प्रेरणा घेऊन चलचित्र बनविणारे सावे दादा, मूकपटांनी व्यापली दोन दशके , दादासाहेब तोरणे यांनी केलेला भक्त पुंडलिका चा प्रयोग,  दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमा उद्योगाचा केलेला श्री गणेशा, बाबूराव पेंटर यांनी त्याला दिलेली कलात्मक परिमाणे अशा  या घटितांचे सूत्रधार ठरली ती मराठी माणसेच..!

– राकेश मोरे

संदर्भ ; १) दादासाहेब फाळके – बापू वाटवे 
२) मराठी चित्रपट सृष्टीचा समग्र इतिहास – रेखा देशपांडे

हेही वाचा :

शिवाजी पार्क

मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह

श्री सिद्धिविनायक मंदिर

Most Popular

Recent Comments